मुंबई : वादग्रस्त ठरलेल्या नीट निकालाविरोधात देशातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नीट पुन्हा घेण्यात यावी किंवा श्रेणी गुण पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घाई-गडबडीत जाहीर केलेला नीटचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेने नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु केला आहे. त्यात २० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून कोटा येथील शिक्षणतज्ज्ञ नितीन विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नीट परीक्षेत ६७ विद्यार्थी हे प्रथम क्रमांकावर आहेत. नीटच्या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत असल्याने सर्व प्रश्न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकला तरी त्याला ७२० पैकी ७१५ गुण मिळणे अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण कसे दिले गेले, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
क्लॅटसाठी अतिरिक्त गुण देण्याच्या सूचना न्यायालयाने २०१८ मध्ये दिल्या होत्या. त्याचा हवाला एनटीएकडून देण्यात येत आहे. परंतु ती परीक्षा ऑनलाइन होती तर नीट ही ऑफलाइन आहे. त्या सूचनेचा दाखला देत ग्रेस मार्क्स देणे कितपत योग्य आहे? पेपर उशिरा वाटला तर जास्त वेळ देता आला असता, गुण का दिले? परिपत्रक, निकाल पत्रात ग्रेस गुणांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. तक्रार करणाऱ्यांनाच ग्रेस गुण मिळाले आहेत. ज्या मुलांनी तक्रार केली नाही त्यांचा काय दोष? एनटीएने १४ जून रोजी निकालाची संभाव्य तारीख जाहीर केली असताना १० दिवस आधीच निकाल जाहीर करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. वेळ कमी पडल्यास अतिरिक्त गुण देण्याबाबत एनटीएकडे कोणताही आधार नसल्याचा मुद्दाही नितीन विजय यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.
Post navigation