CM Fellowship Program : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा एकदा तरुणांसाठी दारे उघडणार आहे.

राज्यातील ६० निवडक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशासनात थेट काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील.

हा कार्यक्रम २०२५-२६ साठी जाहीर झाला असून, तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि ताज्या दृष्टिकोनाचा उपयोग प्रशासनाला होण्यासाठी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत याची अंमलबजावणी होणार आहे.

काय आहे ही फेलोशिप?

या फेलोशिपचा कालावधी १२ महिने असेल आणि निवड झालेल्याना दरमहा ₹५६,१०० मानधन आणि ₹५,४०० प्रवास खर्च असे एकूण ₹६१,५०० मिळतील. याशिवाय, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण या विषयातील विशेष पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमही फेलोंसाठी आयोजित केला जाणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या अभ्यासक्रमात ऑफलाइन आणि ऑनलाइन व्याख्यानांचा समावेश असेल, ज्यामुळे फेलोंना प्रशासकीय कामकाजात उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करता येतील.

कोण पात्र ठरेल?

  • वयोमर्यादा: २१ ते २६ वर्षे (अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंत)
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ६०% गुण)
  • अनुभव: किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव (इंटर्नशिप, स्वयंरोजगार किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुभवही ग्राह्य)
  • भाषा आणि कौशल्य: मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक
  • अर्ज शुल्क: ₹५००

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील – ऑनलाइन चाचणी, निबंध लेखन आणि मुलाखत. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा होईल, त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांपैकी २१० जणांना निबंध लेखनासाठी पाचारण करण्यात येईल. शेवटी, मुलाखती मुंबईत होतील. निवड झालेल्या फेलोंना राज्यातील २० निवडक जिल्ह्यांमध्ये नियुक्ती मिळेल, जिथे प्रत्येक जिल्ह्यात २ ते ३ फेलो कार्यरत असतील.

  • एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागांवर पुरुषांची निवड होईल.
  • फेलोंचा दर्जा हा गट-अ अधिकाऱ्यांप्रमाणे असेल.
  • फेलोशिप पूर्ण झाल्यावर शासनाकडून प्रमाणपत्र मिळेल, तसेच आयआयटी मुंबईकडून स्वतंत्र प्रमाणपत्रही दिले जाईल.

अर्ज कुठे आणि कधी करायचा ?

अर्ज प्रक्रिया http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरू होईल. ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्ड किंवा ओळखपत्र आवश्यक असेल. यापूर्वी फेलोशिपमध्ये सहभागी झालेले फेलो पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

करिअरला नवी दिशा

हा कार्यक्रम पहिल्यांदा फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झाला होता आणि त्यानंतर २०२३-२४ मध्येही यशस्वीपणे राबवला गेला. आता २०२५-२६ साठी पुन्हा सुरू होत असलेल्या या उपक्रमातून तरुणांना प्रशासनात योगदान देण्याची आणि स्वतःच्या करिअरला नवी दिशा देण्याची संधी मिळणार आहे.

राज्याच्या विकासात हातभार लावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “तुमची ऊर्जा, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील प्रभुत्व प्रशासनाला नवी गती देईल. चला, या संधीचा फायदा घ्या आणि राज्याच्या विकासात हातभार लावा,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!