Maratha Reservation …तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर गुलाल फुलांनी सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर

Maratha reservation – मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आक्रमक आंदोलन उभं केलं आहे. या मागणीला विरोधक केल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील असा संघर्ष निर्माण झाला आहे.

आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापू लागल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाबाबत जपून बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. याबाबत प्रश्न विचारताच आता मनोज जरांगेंनी अजित पवारांना खास आवाहन केलं आहे.

“आमदार आणि मंत्र्यांना भूमिका मांडताना काळजी घेण्याची तंबी दिली आहे, तर आता लगेच आरक्षणाचीही तंबी देऊन टाका. लगेच आरक्षण दिलं तर मी नाशिकमधूनच घरी जातो आणि तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो. मराठ्यांची लाखो पोरंही आणतो. आणखी काय सन्मान पाहिजे तुम्हाला?” असं मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या नाशिकमधील सभेत छगन भुजबळांकडून होत असलेल्या वैयक्तिक आरोपांना जोरदार प्रत्युत्तरही दिलं. ‘तुम्ही मुंबईत काय केलं, कुठं भाजी विकली, कोणाचा बंगला हडप केला, हे सगळं मला माहीत आहे,’ असा घणाघात जरांगेंनी केला.

अजित पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला आमदार आणि मंत्री उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलकांनी आमदार-खासदारांसाठी गावबंदी करण्याची घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं मत आमदारांनी अजित पवारांसमोर व्यक्त केलं. तसंच छगन भुजबळ यांच्यावर होणाऱ्या टीकेला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. आमदारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी सर्वांना जपून बोलण्याच्या सूचना दिल्या.

अधिक माहिती येथे पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!