E-Peek Pahani: सध्या ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना मदत व्हावी यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रियेची थोडक्यात माहिती.
पीक विम्यात ई-पीक पाहणी महत्त्वाची का?
पीक विम्याचा लाभ मिळण्यात ई-पीक पाहणी पहिला टप्पा आहे. शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केली नसेल, तर क्षेत्र नापेर पकडले जाण्याची शक्यता असते. समजा एखाद्या शेतकऱ्याने ई-पीक पाहणी केली नाही. तर अशा शेतकऱ्याचा पीक पेरा तलाठी नोंदवितात. पण यंदा तलाठ्यांना पीक पेरा नोंदवण्यास मनाई करण्यात आल्याचे काहीजण सांगतात. यंदा १०० टक्के ई-पीक पाहणी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. अनेकदा हा पेरा आणि प्रत्यक्ष पीक यामध्ये तफावत असते. अशी तफावत असल्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पीक विमा योजनेतही ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक आणि प्रत्यक्ष पिकात तफावत दिसत असेल, तर ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेल्या पिकालाच अंतिम गृहीत धरले जाईल. त्यामुळे ई पीक पाहणी महत्त्वाची आहे.
E-Peek Pahani ई-पीक पाहणी येथे करा ऑनलाईन मोबाईलवर
ई-पीक पाहणीचे फायदे
– खरीप २०२२-२३ पासून ई-पीक पाहणी प्रणालीत संकलित झालेली माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या किमान आधारभूत किंमत योजनेकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीत नमूद केलेल्या पिकाची खेरदी केली जाणार आहे. भातापासून याची सुरवात करण्यात आली आहे.
– बँकांना पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची पडताळणीसाठीही ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे.
– नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाने तयार केलेल्या ई-पंचनामा ॲपमध्ये ई-पीक पाहणी प्रणालीत संकलित केलेली माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुलभ होणार आहे. E-pik pahani
– शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.
– राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पिकासाठी एकच सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येत असल्यामुळे गाव/तालुका/जिल्हा/विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे. याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.
– कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादींचे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.
– आधारभूत किमतींवर धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
– खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येते.
– कृषी गणना अंत्यत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या पूर्ण करता येईल.
ई-पीक पाहणीत भूमिका?
शेतकरी :
शेतकरी हा ई-पीक पाहणी प्रणालीचा प्राथमिक वापरकर्ता असेल. शेतकरी आपला मोबाईल नंबर नोंदवून व नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पीक पाहणीला सुरवात करू शकतो.
खासगी सर्वेक्षक किंवा सहाय्यक :
खासगी सर्वेक्षक किंवा सहाय्यक हा स्थानिक गावातील व्यक्ती असणे आवश्यक आहे. खासगी सर्वेक्षकाला मोबाईल ऍप्लिकेशनवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य असेल. तालुका अधिकारी हे खासगी सर्वेक्षकाची नेमणूक करतील.
सुपरवायझर किंवा तलाठी :
शेतकऱ्याने केलेल्या पीक पाहणीपैकी १० टक्के पडताळणी तलाठी करतील. तसेच खासगी सहाय्यक किंवा सर्वेक्षक यांच्यामार्फत मोबाईल अॅप मधून केलेल्या पीक पाहणीची १०० पडताळणी तलाठी करणार आहेत.
व्हेरीफायर :
पडताळणी करणारा हा सरकारी नियुक्त अधिकारी असेल. सुपरव्हायझर किंवा तलाठी यांच्यामार्फत दोन वेळेस नाकारलेल्या सर्वेक्षणांची पडताळणी करून पुन्हा पीक पाहणी करेल. व्हेरीफायर हा तालुका अधिकारीद्वारा नियुक्त केलेला असेल.
ई-पीक पाहणी कशी करावी?
ई- पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी व्हर्जन २ हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे. या नव्या अॅपमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सुधारित मोबाईल अॅपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे (centroid) अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील त्यावेळेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
मोबाईल अॅप उघडल्यानंतर काही परवानग्या द्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला लॉगिनचे अनेक पर्याय दिसतील. त्यापैकी ‘’शेतकरी म्हणून लॉगीन’’ करा हा पर्याय निवडा. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकावा. पहिल्या वेळेस खातेदार नोंदणीसाठी विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडा. आपण टाकलेला खातेक्रमांकही नोंदवावा. पुढे या बटणावर क्लिक केल्यावर वापरकर्त्याला नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलायचा आहे का? अशीही विचारणा केली जाते. बदलायचा असल्यास तसा क्रमांक बदलताही येतो.