Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या आहेत. असं असताना राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
निवडणुक कार्यक्रम नेमका कसा असेल?
“संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
Maharashtra election 2023
Post navigation