Breaking News आदर्श घोटाळा नंतर देवाई पतसंस्थेच्‍या अध्यक्षा मीना काकडे घोटाळा करून पतीसह पसार

Special Report :  छत्रपती संभाजीनगरातील देवाई पतसंस्थेने लावला ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा अध्यक्षा मीना महादेव काकडे, आणि संचालक पती महादेव अच्युतराव काकडे पैसे घेऊन लंपास झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी चौथा गुन्हा दाखल झालेला असताना छत्रपती संभाजीनगरातील आणखी एका पतसंस्थेचा मोठा घोटाळा समोर आला आहे. देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत तब्‍बल २२ कोटी रुपयांचा घोटाळा करून ग्राहकांना पैसे देतो म्हणत 6 महिने झुलवत ठेवत अखेर पतसंस्थेच्या अध्यक्षा मीना महादेव काकडे व कार्यकारी संचालक महादेव अच्‍युतराव काकडे हे पत्‍नी-पती पसार झाल्याचे धक्कादायकरित्या समोर आले आहे. यामुळे ठेवीदारांच्या पोटात अक्षरशः गोळा आला असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्‍यता आहे.

पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले, की काकडे दाम्‍पत्‍यासह सर्व शाखा व्यवस्थापक, कर्ज विभागप्रमुख, कर्जदार व जामीनदार यांचा संशयितांत समावेश आहे. या प्रकरणात लेखा परीक्षक दत्तात्रय प्रभाकर धुमाळ (वय ५६, रा. लाडगाव रोड, वैजापूर) यांनी तक्रार दिली. त्‍यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्‍यानच्या पतसंस्थेच्या व्यवहारांचे लेखा परीक्षण केले.

त्‍याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. यातून मोठाच कर्जवाटप घोटाळा समोर आला. नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करण्यात आलेले आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी पतसंस्थेची निवडणूक झाल्यानंतर २४ जून २०२१ रोजी मीना काकडे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्‍यानंतर ३० जून २०२१ पर्यंत सर्व समिती सदस्यांनी राजीनामे दिले. ९ जुलै २०२१ रोजी ते मंजूर झाले. त्‍यावर अध्यक्षा मीना काकडे यांनी पती महादेवची कार्यकारी संचालक म्‍हणून निवड केली. नियमानुसार समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांनी निवड करणे अपेक्षित होते. मात्र दोघा पती-पत्‍नीनेच पतसंस्थेचे कामकाज पहायला सुरुवात केली.

फोटो: अध्यक्षा मीना महादेव काकडे सह पती महादेव अच्युतराव काकडे

बोगस कर्जवाटप..
मे. केएमके ट्रेडिंग – ४ कोटी ७६ लाख ३३ हजार ५४० रुपये
मे. केएमके ट्रेडिंग प्रा. लि. – ७ कोटी १४ लाख ९२ हजार १०९ रुपये
मे. केएमके अर्बन निधी लि. – ६८ लाख १० हजार ७४० रुपये
मे. देवाई मेडिकल ॲन्‍ड जनरल स्‍टोअर्स – ६४ लाख ५२ हजार ७१२ रुपये
आप्पासाहेब प्रल्हाद चव्हाण – ६० लाख रुपये
असे एकूण १३ कोटी ८३ लाख ८९ हजार १०१ रुपयांचे बोगस कर्ज स्वतः काकडे दाम्‍पत्‍यानेच उचलले. या कर्ज प्रकरणांचा संचालक मंडळाची मान्यता नाही. ज्‍या काळात कर्ज दिले त्‍यावेळी संचालक मंडळच अस्तित्‍वात नव्हते. या कर्ज प्रकरणांची फाईल लेखा परीक्षकांनाही मिळाली नाही. पैकी २ कोटी २० लाख कर्ज रोख दिले गेले आहे हे विशेष. त्यामुळे ते वसूल होण्याचा विषयच नव्हता.

केएमके म्हणजे नेमकं काय?
अनेकांना प्रश्न पडेल की केएमके नावाने एवढी मोठी दुकानदारी कुणाची की काकडे दाम्‍पत्‍याने एवढे मोठे कर्जवाटप केले. प्रत्‍यक्षात ही दुकानदारी काकडे दाम्‍पत्‍याचीच आहे. त्‍यांनीच वेगवेगळे व्यवसाय दाखवून कर्ज लाटले. केएमके दुसरा तिसरा कुणी नसून त्‍यांचाच मुलगा कृष्णा महादेव काकडे आहे. विशेष म्‍हणजे, काकडे दाम्‍पत्‍याने ताळेबंदात आयसीआयसीआय बँकेत ८ कोटी ७ लाख २५ हजार ६५१ रुपयांची एफडी दाखवली. प्रत्‍यक्षात अशी कोणती एफडीच काकडे दाम्‍पत्‍याने केलेली नाही. आता हे दाम्‍पत्‍य थायलंडला पळून गेल्याचे सांगितले जाते. त्‍यामुळे त्‍यांना पकडणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार रान माजवून असतानाच आता नव्या देवाई पतसंस्थेचा घोटाळा ठेवीदार काय करतील या धास्तीत पोलीसही आहेत.

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!